२७ फेब्रूवारी, १९३१ रोजी जेष्ठ क्रांती सेनानी चंदरशेखर तिवारी (आझाद) यांचा देह धारातिर्थी पडला. त्यांच्या चरणी रुजू केलेली कवितारुपी पुष्पांजली.

आझाद

त्या मृत्यूंजयास कुशीत घेऊनी
अमर झाले ते जांभळीचे झाड
मनोमन स्तब्ध होऊन बोलले
आता निजूदे क्रांतीवीरास गाढ

पानांस वदले तुम्ही स्तब्ध रहा
अजिबात करु नका हालचाल
इथे श्रमून विसावलाय रणवीर
हवेसही सांगू नका त्याचे हाल

जन्मांतरीचे पुण्य असे म्हणूनी
मातृभूमीचा लाल मज दिसला
अजरामर करीत नाव स्वत:चे
मम कुशीत चिरंतन विसावला

मृत्यूला करुनी स्वत:चा यार
संपला वेडा खाईत यातनांच्या
स्वातंत्र्याचा अनमोल मंत्र मग
बनला ध्येय आयुष्याचे त्याच्या

फुलवून देशभक्तीची फुलबाग
जाप केला इन्कलाब जिंदाबाद
वेदिवर चढवून स्वत:चा बळी
संपला मातृभू करावया आझाद

आतातरी सतेज होतील श्वास
पाहुनी ह्या वीर-भद्राचे समर्पण
समिधा करतील पुत्र स्वकायेची
चुंबूनी घेतील हिंद भूमीचे चरण

हिंदुह्रदयसम्राट: एक प्रतिभावान शलाका (१८.११.२०१२)

ऋद्राक्षांची अखंड माला           हाय अखेरी भंग पावली
एक शलाका प्रतिभावान          विश्वहिंदुत्व जगून गेली
अर्धतपाच्या राज्य प्रवासी          मराठीचे ती श्वास झाली
हीनदीन जनतेच्या कंठी         लढण्याचा आवाज झाली

समर्थ स्वयंभूत प्रतिभेतून          सार्थ जगणे दावून गेली
बुलंद मऱ्हाटी वक्षांमधून          महाराष्ट्राचा घोष बनली
एकच हाक, एक इशारा         ठिणगीची मशाल केली
शब्दांप्रती जे देतील प्राण          ऐसी सैनिक सेना केली

सन्मान हरवल्या जनांस          प्रतिकाराची शक्ती दिली
खेडोपाडी अन् प्रांतोप्रांती          संघराज्याची गुढी रोवली
ऋद्राक्षाची हि माला आता          असेल जरी भंगून गेली
परि धनुष्यांच्या प्रत्यंचेतील          व्याघ्रशरांचे गर्जन झाली

भान

तुझे रुप विश्वाकार, कण सांडूनी गेले
ब्रह्म,सत्य जगनमिथ्या ठरवूनी गेले
जैसा फेस जळाचा फेसांत जळ दडले
तैसेचि चैतन्य अव्दैतांत एकरुपि झाले

कर्मयोगे तोडूनी फल राजयोगे जोडले
अव्यक्त तव मूर्तीने सर्व जगत व्यापिले
जरी सुदाम्याने पोहे एकमुठीने मापिले
हरिमुखे भक्तिरस रिचवून लिप्त झाले

कर्मात अकर्म योगे आत्मलिंगे पाहिले
सृष्टीचे परमतत्व तू योगीरुपे जाणिले
सारे कर्म लेशमात्र न करुन सारे केले
निष्काम अव्वलाचे वेड मजला लाविले

पूर्णसत्य मोक्षरुपे तूच गणिते मांडिले
सणंग माझे षडरिपू कर्मयज्ञे जाळिले
तुझिया दर्शने मज विश्वरुप हे दिसले
अन् व्यष्टीसमष्टीचे सापेक्ष भान आले

एकची दान

तुज चरणी मज नित्य ध्यान असावे
दीनानाथा मजला एकची दान द्यावे........धृ

तुझ्या अनुभूतीची कवने मी गावी
नाम स्मरणाची सुमने तुला द्यावी
तुझ्या पायी मी एक बिंदूसम रहावे
तुजसमीप माझे एक स्थान असावे

तुजसमीप माझे नित्य स्थान असावे
दीनानाथा मजला एकची दान द्यावे.........१

तुझ्या अनुभूतीचे निमित्त मिळावे
निजरुपाचे मज देवा दर्शन व्हावे
पुनित व्हावे मी भूवरी या जन्मून
तुझ्या नामाची महती मी गाऊन

सकलांचे मम देही तेच ध्यास असावे
दीनानाथा मजला एकची दान द्यावे.........२

हास्याचे अश्रू

मन कुणा देऊन झाले अन् तन कुणा वाहून झाले
ओठांवर रेंगाळले हासू अन् अश्रू पिऊनी टाकिले

दारी येऊनी गेले खूप
परंतु रिकामे हात होते
जणू माझ्या प्राक्तनात
तेच काळाचे भोग होते

प्राक्तनाचे हे भोगच माझे कोण भाळी लिहूनी गेले
ओठांवर रेंगाळले हासू अन् अश्रू पिऊनी टाकिले

अतंरातील दाह माझ्या
उसळावी लालसा जेथे
संपलो इथे सार्यांसाठी
सोडले माझे श्वास तेथे

घोट समजूनी अमृताचा जहर जहाल प्यावे लागले
ओठांवर रेंगाळले हासू अन् अश्रू पिऊनी टाकिले

नाम-स्मरण

कलियुगी दृष्ट मातले राज्य अधर्माचे          पतन जाहले वर्तमाने माझ्या स्वधर्माचे
पवित्र्याने कसे जगावे हे मज सांगाया          धाव धाव धर्मरक्षणा हे प्रभो रामराया !!

तुझे चरणा पुण्यकर नमित मी व्हाया          हाच भाव मनांत येवो सहजी रुजाया
चित्ती धरतो एक नेम तुलाच पुजाया          धाव धाव धर्मरक्षणा हे प्रभो रामराया !!

षड्रिपुंचे स्थान जीवनी जळे देह वाया          दूरदूर नेती मजला तुजपासोनी राया
आतुरलो मी प्रसादा तुझ्याच रे रघुराया          धाव धाव धर्मरक्षणा हे प्रभो रामराया !!

चित्तशुध्दी मम देहाची नित्य राखाया          गोडी लागो मुखाग्रे तुझे गुण गाया
एक दान स्मरण नाम वैखरी नांदाया          धाव धाव धर्मरक्षणा हे प्रभो रामराया !!

पर्जन्य

त्वरिताघाते मोडून पडतो अंबरी जलदांचा पसारा
उद्युक्त पयोद धावत येती घेऊनी पर्जन्याच्या धारा
क्षणांत बदले रुप अवनीचे साज करिते ती न्यारा
कुणी म्हणती सावन ह्यास कुणास ऋतू हा प्यारा

बीजपत्रेही सतेज होऊनी प्रसविती नवथर अंकुरा
कोमलपर्णे झुलू लागती मखमल पाचूमय अंगणा
प्रसन्नतेचे वरदान मिळता सुखावून जाई वसुंधरा
हरितविलोभी सौभाग्यलेणे शोभून दिसते तीला

मौक्तिकमाला हिरेमाणके शृंगार करीते ती सुंदरा
लहानथोर किती पाखरे गिरक्या घेती हो भरभरा
लगबग त्यांची सृजनाची बांधल्या घरट्यांत चारा
ऐसे जीवन फुलून यावे वर्षाराणीच्या कोमल करा

परमेश्वरा

अवखळ चैतन्याचे वाहतील झरे
परमेश्वरा मज इतुके जीवन पुरे......१

लहरतात कसे स्वक्षर आमोद तरंग
जैसा गगनी फिरतसे तरल विहंग
मुक्त तलम तारुण्याच्या उठती लहरी
रम्य असेल वसुंधरेतील वनचरी
भोगण्यास मज जितके क्षण हे उरे
परमेश्वरा मज इतुके जीवन पुरे......१

अरे नसेल मजपाशी कुठले वरदान
युगांयुगांचे तुझे मधुर पसायदान
संकुचित वाटा अन् कष्टांचे जीवन
तुझिया कृपाप्रसादे होईल ते पावन
हेच असावेत क्षण ज्यांत भक्ती पाझरे
परमेश्वरा मज इतुके जीवन पुरे......२

हे प्रकाशमित्रा

नमस्ते नमस्ते; नमस्ते प्रकाशमित्रा
समाजभिमूक मूल्या, बाबांचे सूता
अथांग कष्ट, दीर्घ ध्येय समरसता
नमस्ते तुजला सेवाव्रत रुपी दिगंता

पतितोध्दार कार्या स तू दिली मूर्तता
कितिक वंचना अन् वेदना पदस्थता
तरी बांधिला पथ उपेक्षितांचे सिध्दा
नमस्ते तुजला सेवाव्रत रुपी दिगंता

अमूल्य वारसा बाबांचा तुज लाभता
ऐसाच राहो मार्गस्थ ह्याच कल्पांता
तव ध्येयाप्रति मिळू दे सफल मूर्तता
नमस्ते तुजला सेवाव्रत रुपी दिगंता

रक्षा

दत्तात्रेयाचे सहा नेत्र ते
सातवा शिवाचे माथी
तैसे राहिले सहा स्वार
प्रतापी रावांच्या पाठी

राव दौडले अती त्वेषाने
सोडूनी काळाचे भान
हाती भाला रिकिबीत पाय
उंचावून मर्दानी मान

शब्द राजांचे सुरुंगची ते
अंतरास जाळित गेले
नुरला धीर संपता विवेक
मृत्यूस चुंबण्या वेडे आले

उडून धूळ तडकली माती
कोसळती वीजेचे लोळ
तुटून पडले एक ध्येयाने
श्वासांचे मग कैसे मोल

स्फूंद वादळ रोरांवत यावे
तैसे रुद्रांचे सप्तक आले
अतुल तेज तळपूनी तेथे
शिव भाळीची रक्षा झाले

राम

श्रीराम सावळा अनुपम सुंदर          निजरुप त्याचे अतीव मनोहर
दर्शनास तव तिष्ठलो निरंतर          विनम्रभावे जुळती माझे कर

दिव्य तेजाचा तो रुपक अक्षर          चरणपूजेचा मी साधक पामर
सकल सृष्टीचा तोची आधार          चरणी त्याच्या नमिलो सत्वर

प्रमत्त जरी मी कधी अगोचर          वंचित, पराधिन देहची नश्वर
त्याचीया कृपेची छाया फुलोर          नित्य बरसावी ईश्वरा मजवर

युगायुगांचा तोच एक युगंधर          सकल सृष्टीचा त्यास गहिवर
अनंत रुपके जाणावी कुठवर          तेजाने त्याच्या दिपलो क्षणभर

राव प्रताप

सागराने भक्षिले भूमीस तैसे दैवाने वेचले मोती
आसमंत उजळून गेल्या सात निरामय ज्योती !!धृ!!

सप्तशूलांस हाती धरुन वायुवेगे स्वार दौडले
नेसरी खिंडीत निधडे शिवगण रुद्र थडकले
गनिमांवर उठल्या जेव्हा त्यांच्या शमशेर पाती
आसमंत उजळून गेल्या सात निरामय ज्योती !!१!!

मस्तकी विकल संताप ह्रदयांत सूडाची आग
विसरले मार्ग परतीचा घेऊनी सूडाचा ध्यास
उसळले ते वीर मर्दानी आयुष्य सांडूनी पाठी
आसमंत उजळून गेल्या सात निरामय ज्योती !!२!!

मैर्द मावळी टापा यवनांवरी ऐस्या धडकल्या
अस्मानीच्या चंडाशूसम ज्वाळा पेटत्या झाल्या
मर्दगड्यांचे शौर्य पाहून शहारुन गेली धरती
आसमंत उजळून गेल्या सात निरामय ज्योती !!३!!

विवेकास नच उरे रीघ सरदारी विसरले राव
एकेक बांध निखळला झेलताना पठाणी घाव
शर्थ झाली शौर्याची परि निवून गेल्या तेजवाती
आसमंत उजळून गेल्या सात निरामय ज्योती !!४!!

स्मरण

सांडिले त्यांनी रक्त रणी
अन् त्यागाने भूषित झाले
रक्षिता भूमी मरणा चुंबिले
त्या वीरांचे स्मरण करावे

स्वकायेची सोडवूनी आस
सहज जे धावले आत्मयज्ञे
पतंगासम जे भस्म जाहले
त्या वीरांचे स्मरण करावे

जन्मांतरीचे पुण्य असावे
म्हणूनी ऐसे पुत्र जन्मले
ह्या भूमीसही गर्व असावा
त्या वीरांचे स्मरण करावे

किती नावे घ्यावी आपण
शब्दही जिथे थिटे पडावे
अजरामर केले स्वजन्मा
त्या वीरांचे स्मरण करावे

संपले जे श्वास रणांगणी
त्या वीरभद्रांवर गीत गावे
समीधा झाली आयुष्याची
त्या वीरांचे स्मरण करावे

तुकारामांचा मुळ (अभंग-१९९९)

तुझे पाय माझे राहियेले चित्ती
ते मज दाविती वर्म देवा
आम्हा अंधा तुझ्या पायांचा आधार
जाणसी विचार चालविता
मन स्थिर ठेले इंद्रिये निश्चळ
हे तो माझे बळ नव्हे देवा
पापपुण्य भेद नासिले तिमिर
त्रिगुणे शरीर सांडियेले
तुका म्हणे तुझा प्रताप हा खरा
मी जाणे दातारा शरणागत

सर्मपणात्मक मराठी रुपांतर

चित्तात व्यापिले माझ्या देवा तुझेच पाय
अंतरंगात दाखविण्या माझेच वर्म काय
आम्हा अंधा जरी तुझीच पाऊले आधार
चालविण्यास आता जाणू दिलास विचार
मन ठेविलेस स्थिर आणि इंद्रिये निश्चळ
नव्हते माझे परमेश्वरा तुझेच हे असे बळ
सांडिले आहे माझे त्रिगुणात्मक शरीर
भेदून पापापुण्या सारिलास तूच तिमिर
तुका म्हणे देवा तुझीया प्रसादे मी खरा
शरण आलो तुजलागुनी जाण रे दातारा

याचिका

आकाशीच्या बापा; आता तरी भूमीला मान दे
तुझ्या गच्च पदरांतून; हिरव्या अंकुरांचे दान दे

कोण जाणे कोठली पुण्ये; येतील येथे फळास
मातीमधल्या चैतन्याला; आता तरी आकार दे

पिकांतल्या कणसांतून; चांदणे बहरुन येऊ दे
ऋतुगंधाने चेतवून धरा; मज पाखरांचे पंख दे

जरी मी भयाण वाटा; धुंडाळीत जातो आहे
तरी जीर्ण झोपडीत माझ्या; स्वप्नांची बहार दे

डोळ्यांतली भुक माझ्या; हातांचे बळ होऊ दे
गुंतले जरी प्राण माझे; तरी जगण्याची आस दे